Saturday, May 20, 2017

आनंदघर डायरीज

हर्षल

सुरुवातीच्या मरिमाता मंदिराच्या परिसरात रिकामटेकडी लोक पत्ते खेळत बसलेली असायची. नाहीतरी पैसे लाऊन इतर खेळ सुरु असायचे, याच अंगणात आनंदघर सुरु झाले आणी चित्र पालटायला सुरुवात झाली. सुरुवातीला आम्ही तिथे बसलो तरी आम्हाला न जुमानणारी हि लोकं आता आम्ही आलोय हे दिसताच स्वतःचे सामान आवरून बाहेर पडायला लागली. पत्त्याच्या जागी आता लहान चिमुरड्याची लगबग तिथे सुरु झाली. मरिमातेचे आंगण लहान मुलांनी गजबजून जायला लागले. अश्याच एका दिवशी एक मुलगा आमच्या जवळ आला आणि “सर, उद्या पासून मी पण येऊ का?” अस आम्हाला विचारल अर्थातच आम्ही लगेच त्याला हो सांगितल. तो परत जायला निघाला तेव्हा “अरे तुझ नाव तर सांग.” अस मी त्याला विचारलं आणि तो म्हणाला, “हर्षल”.
हर्शल तेव्हा ८वीत होता. अंगकाठी अगदी बारीक. घरी तो, त्याचे आई-वडील आणि भाऊ. तिथेच जवळ त्याच्या वडिलांची भाजी-पाल्याची गाडी होती. हर्षल इतर मुलांपेक्षा खूपच वेगळा. अत्यंत हुशार. बुद्धिमत्ता तीव्र. सतत नवीन काहीतरी करण्याच्या शोधात. त्याच्या वयाच्या इतर मुलांसारखी त्याला कुठलीच व्यसन नव्हती. अत्यंत शांत. कधी कुणाशी भांडण नाही, कुणाला शिव्या देणार नाही, कुणाची खोड काढण नाही.
त्याकाळात जळगावात लोडशेडिंग सुरु होत. इतर ठिकाणी २ तास लाईट जात असेल तर तांबापुरात सकाळी २/३ तास आणि संध्याकाळी २/३ तास अशी किमान ४/६ तास वीज नसायची. सकाळच्या वेळी काही अडचण यायची नाही. पण संध्याकाळी वीज नसली कि हर्षलला अभ्यास करायला त्रास होत होता. या पठ्याने एक दिवस भंगारबाजारात जाऊन २० रुपयाचे LED लाईट, मोबाईलची बॅटरी आणली, इकडून-तिकडून काही तारा गोळ्या गेल्या आणि चक्क दिवसाचार्ज केले कि रात्री वीज गेल्यावर देखील व्यवस्थित उजेड देणारे बल्ब तयार केले. आनंदघरात येताना आम्हाला दाखवायला घेऊन आला.
त्यानंतर काही दिवसांनी गाणी ऐकायला काही नाही अस वाटल्याने परत भंगारबाजारात जाऊन थोड्या वस्तू विकत आणल्या आणि त्याचा मोबाईलच्या बॅटरीवर चालेल असा चक्क FM रेडीओ तयार केला आणि तोही फक्त ३० रुपयात. आम्हाला या पोराच प्रचंड कौतुक वाटल.
एके दिवशी हर्षल आनंदघरात आला नाही, दुसऱ्यादिवशी त्याला कुठे गेला होतास अस विचारल्यावर. “आमच्या समाजाचा कार्यक्रम होता. मग आपल्या समाजाच्या कार्यक्रमात जायला नको का?” अस त्यानेच मला प्रतिप्रश्न केला. याचाच आधार घेऊन मी आणि हर्षल बोलायला लागलो. बराच वेळ बोलल्यानंतर, अगदी शेवटी तो मला म्हणाला,”मग जर कुणी आपली जात विचारली तर काय उत्तर द्यायचं?” मी म्हणालो,”माणूस म्हणून सांग”. आणि तो विषय तिथेच संपला.
तांबापुरा परिसरात हिंदू-मुस्लीम लोकसंख्या जवळपास समान आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी इथे देखील दर काही महिन्यांनी वादाची ठिणगी पडली जाते आणि जातीय दंगली घडवून आणल्या जातात. काही दिवसानंतर अशीच एक दंगल घडली, ज्यामुळे पुढचे काही दिवस आम्हाला आनंदघर बंद ठेवावे लागले. ज्यावर नंतर चर्चा करताना मुलांनी हे कस चुकीच आहे अशी याबद्दल स्वतःहून चर्चा केली. या चर्चेत अचानक हर्षलने मला प्रश्न केला,”सर तुमची जात कुठली?” मी लगेच उत्तर दिले,”माणूस”. “ठीक आहे.” अस म्हणून हर्षलच उत्तर आला. “का रे अस काय झाल तुला विचारायला?” तर त्यावर त्याने उत्तर दिल,”नाही काही दिवसापूर्वी तुम्ही मला सांगितल होत कि जात विचारली तर माणूस म्हणून सांगाव आणि तसच वागाव. मग मी बघत होतो, आता तुम्ही काय उत्तर देता ते.” तुमच्या प्रत्तेक कृतीवर, बोलण्यावर मुलाचं अगदी बारीक लक्ष असत. अनेक बाबतीत ते तुमच अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. अश्या वेळी जर तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक वाटला तर मुल लगेच तुम्हाला तो दाखवून द्यायला कमी करत नाहीत किंवा त्यांचा तुमच्या बोलण्यावरून विश्वास उडायला लागतो, पण हेच जर तुम्ही जे बोलता तसेच वागता अस मुलांचा जाणवत तेव्हा त्यांचा तुमच्याबद्दलचा आदर, प्रेम वाढत या सर्वोत्तम प्रात्यक्षिकच त्या दिवशी मला मिळाल.
कुमार निर्माणच्या शिबिरात वर्षभरात केलेल्या कृतींची माहिती देण्याच काम देखील याचच. . या शिबिरांमध्ये मुलच कामाची माहिती देतात आणि इतर गटातली मुल त्यांना प्रश्न विचारतात. अश्याच एका शिबिरात एकाने ‘सचिन – क्रिकेटचा देव’ या विषयावर माहिती दिली. यावर हर्षलनेस सचिनला क्रिकेटचा देव का म्हणतात? असा प्रश्न केला. थोड्याच्या गोंधळात पडलेल्या त्या मुलाने “कारण त्याने खूप सेंच्युरी मारल्या आहेत म्हणून.” असे उत्तर दिले. यावर “पण साईबाबांनी तर एकपण सेंच्युरी नाही मारली मग त्यांना आपण देव का म्हणतो?” असा प्रतिप्रश्न केल्यावर समोरचा गारच पडला.

९वीची परीक्षा दिल्यानंतर हर्षलने एका इलेट्रिशियनच्या हाताखाली उन्हाळाच्या सुट्टीमध्ये काम केल. १०वी सुरु झाल्यावर हर्षल पुन्हा यायला लागला. पण हर्षलच्या शैक्षणिक गरजा इतरांपेक्षा वेगळ्या होत्या. इतरांसोबत तो आला तर त्याला वेळ देणे शक्य होत नव्हते. तरी इंग्लिश आम्ही शिकत होतो. अश्यातच त्याने इतर विषयांसाठी दुसऱ्या ठिकाणी शिकवणी लावली. याच काळात त्याने घर देखील बदलले. इतर शिकवणीच्या वेळा आनंदघराच्या वेळेतच आल्याने, त्याचे आनंदघरात येणे बंद झाले. मात्र अधूनमधून हर्षल भेटत राहतो. हर्षलला टिकवून न ठेवता आल्याची खरतर एक सल मात्र कायम मनात घर करून आहे. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. कदाचित १०वीची परीक्षा दिल्यावर हा पोरगा परत येईल. 

No comments:

Post a Comment

The story how we stopped 8 children from migrating for sugar-cane cutting with their parents....

  Hope is a good thing, may be best of things and no good thing ever dies... Our Fellows were very much disturbed when they got to know that...