Thursday, March 15, 2018

निरोज गेस्ट.....



परवा मी ‘निरोज् गेस्ट’ वर लिहिलेली पोस्ट अनेकांनी वाचली, शेअर केली, त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या. मला मोर्च्याच्या, आंदोलनाच्या, सरकारच्या आणि विरोधी पक्षांच्या राजकारणात जायचं नाहीये. खरतर ती पोस्ट लिहिण्या मागची अनेक कारण आहेत. सरकारची आणि समाजाची शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती असेलेली असंवेदनशीलता, समाजच स्वतःच्या आनंदात, सुखात मश्गुल असण ही जशी काही कारणं झाली तसेच दुसरे कारण म्हणजे अलका धुपकर आणि इतर पत्रकारांनी मोर्च्यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या रक्ताळलेल्या पायांचे फोटो. 
वूडलॅन्ड, रिबॉक, नायकीची चार-सहा हजाराची बुट आणि सॅन्डल घालणारी आपण, घराच्या कोपऱ्यावर दुध घ्यायचं झालं तरी टू-व्हीलर आणि कार नेणारी आपण, आज किती चाललो हे मोजण्यासाठी हातात ‘smart watch’ घालणाऱ्या आणि त्यावर किती ‘calories’ burn केल्या हे बघणारी आपण, दिवसभर एसीत बसून संध्याकाळी जिम मध्ये (तीही एसी) ट्रेडमिल वर चालून, “आज मी ३ किमी चाललो बाबा!” अस कौतुकाने आणि ‘अभिमानाने’ मित्रांना सांगणाऱ्या आपल्याला भर उन्हात साधी स्लीपर घालून शेकडो मैल चालणाऱ्या शेतकऱ्यांच दुखः, त्रास, वेदना समजतील तरी कश्या?
शब्दांपेक्षा चित्रजास्त परिणामकारक असतात असे म्हणतात. मात्र काही अशी चित्र असतात जी कितीही ठरवलं तरी तुमच्या नजरेसमोरून पटकन जात नाहीत. तुमचे विचार अनेक काळ त्या चित्रांभोवती फिरत राहतात. अगदी तसचं मोर्च्यात सहभागी शेतकऱ्यांची रक्ताळलेली पाउल बघून माझ देखील झालं. त्या पाउलांनी मला अस्वस्थ केलं आणि लिहित केलं.
अनेकांना त्यात राजकारण दिसतय पण मला मात्र फक्त ती रक्ताळलेली पाउलच तेवढी दिसतायेत. अश्या अनेक छायाचित्रांनी मला कायमचं अस्वस्थ केलंय. इतिहासात अशी अनेक महत्वाची चित्र आहेत तसाच प्रत्तेक चित्राचाही काहीतरी इतिहास असतोच. दुर्दैवाने यातली अनेक चित्र ‘निरोज गेस्ट’ या संकल्पनेभोवतीच फिरतात. अशीच काही छायाचित्र आणि त्या मागचा इतिहास तुमच्या समोर पुढील काही दिवसात टप्प्या-टप्प्याने घेऊन यावं आणि आपल्यातल्या संपून चाललेल्या संवेदनशीलतेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करावा एवढीच इच्छा!


No comments:

Post a Comment

The story how we stopped 8 children from migrating for sugar-cane cutting with their parents....

  Hope is a good thing, may be best of things and no good thing ever dies... Our Fellows were very much disturbed when they got to know that...