Thursday, March 22, 2018

The Nigerian Witch Boy



नायजेरिया, आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेला छोटासा देश. लोकसंख्या सुमारे १९ कोटी. लोकसंख्येच्या मानाने आफ्रिकेतील सगळ्यात मोठा देश. ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मीयांची संख्या सगळ्यात जास्त असली तरी २५० हून जास्त समूह असलेला हा देश. जगातील सगळ्यात श्रीमंत कृष्णवर्णीय व्यक्ती नायजेरीन आहे मात्र दुसरीकडे नायजेरियातील ६१%हून अधिक लोकं दारिद्र्यरेषेखाली राहतात. यांचे दैनिक उत्पन्न 1 $ हून म्हणजे ६५ रुपयांहून कमी आहे.
नायजेरियात सार्वजनिक आरोग्य सुविधांचा अत्यंत अभाव आहे. येथील लोकांचे सरासरी आयुष्य ५२ वर्षे आहे, भारताशी तुलना केल्यास भारतातील लोकांचे सरासरी आयुष्य ६९वर्षे तर अमेरिकेसारख्या देशांत हेच ७९वर्षे आहे.  नायजेरियातील साक्षरता दर हा ६०% टक्के आहे. शिक्षण, अंधश्रद्धा या अत्यंत गंभीर समस्या झाल्या आहे.
मुळची डेन्मार्कची अॅन्जा लोवन (Anja Ringgren Lovén) तिच्या नवऱ्यासोबत नायजेरियाला आली आणि लहान मुलांना वाचवण्यासाठी म्हणून त्यांच्या आफ्रिकन चिल्ड्रन एड एज्युकेशन & डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेमार्फत काम करायला सुरुवात केली. ज्यांना वाचवण्यासाठी म्हणून काम करत होती ती मुलं कोण होती? तर घरच्यांनी वाईट शक्तींनी पछाडलेला (Witch), चेटूक करणारा, असे ठरवून सोडून दिलेले, वाळीत टाकलेले हे छोटे जीव. हि चिमुरडी मुलं चेटूक करतात हा त्यांच्यावरचा आरोप. कुटुंबियांच्या वाईट आर्थिक परिस्थितीला, संकटांना मुलांनी केलेलं चेटूक कारणीभूत आहे या मानसिकतेतून नायजेरियात असंख्य मुलांना पालक सोडून देतात. जी घरात टिकतात त्यांना याच कारणाने कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडावे लागते.
एकदा का एखाद्या मुलाला / मुलीला पछाडलेल ठरवले गेले कि बाधा दूर करण्यासाठी गावातील पुजाऱ्याला किंवा एखाद्या मांत्रिकाला बोलावले जाते. एका अभ्यासानुसार नायजेरियात १९९९ पासून आजपर्यंत सुमारे १५००० मुलांना पछाडलेला (witch boy / girl) म्हणून वाळीत टाकण्यात आले आहे तर १००० हून जास्त मुलांना मारले गेले आहे.
फोटोतल्या ह्या चिमुरड्यामुलावर देखील असाच आरोप करून घरच्यांनी त्याला सोडून दिले होते. नायजेरीच्या रस्त्यांवर पडलेला कचरा खाऊन हा न जाणो किती दिवस जगत होता. अॅन्जा लोवनला तो दिसला त्यावेळी पूर्णपणे नग्नावस्थेत होता, त्याच्या हाडाचा सापळा तेवढा उरला होता. संपूर्ण शरीरावर जखमा होत्या आणि अळ्यांनी ते शरीर पोखरून काढलेलं होत. त्याला नीट उभ राहता येत नव्हत कि नीट चालता येत नव्हत.
३० जानेवारी २०१६ला अॅन्जाने या मुलाला वाचवलं. या दिवसाबद्दल अॅन्जा म्हणते, “आम्हाला फोन वर एकाने अगदी २/३ वर्षाच्या मुलाबद्दल माहिती दिली होती. एवढ लहान मुलं फार काळ रस्त्यावर एकट जगू शकत नाही म्हणून आम्ही लगेच तयारी सुरु केली. आम्ही ज्यावेळी मुलाच्या शोधात या गावात पोहोचलो तेव्हा माझ लक्ष रस्त्याच्या कडेला बसलेल्या या अगदी काही वर्षाच्या चिमुरड्याकडे गेल. मी देखील नुकतीच काही महिन्यांपूर्वी आई झाले होते पण ह्या चिमुरड्याची परिस्थिती पाहून मी हादरून गेले. ”
अॅन्जाने त्याला प्यायला पाणी दिलं, बिस्किटं दिली. ह्याच वेळी कोणीतरी हा फोटो काढला. अॅन्जाने स्वतःच्या फेसबुक प्रोफाईलवर हा फोटो शेअर केला आणि काही कालावधीतच हजारो लोकांनी त्यावर कमेंट लिहायला, तो फोटो शेअर करायला सुरुवात केली. पण अॅन्जा लोवन एवढच करून थांबली नाही. तिने  त्याला संस्थेत आणले आणि त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली. त्याचे नाव ठेवले ‘होप’ (Hope). होपला दवाखान्यात दाखल केले गेले. डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर उपचार सुरु केले आणि लवकरच त्याचे परिणाम दिसून येऊ लागले.
होपला मदत करण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जगभरातून 10 लाख डॉलरपेक्षा जास्त रक्कम जमा झाली. यामुळे त्याचे ऑपरेशन होऊ शकले. आज होप अॅन्जाच्या संस्थेतल्या आणखी सुमारे ६० मुलांसोबत राहतो आहे.
२०१६ साली अॅन्जा लोवनला जर्मनीतील ‘Ooom’ मॅगिझनने वर्षातील प्रेरणादायी व्यक्तीचा सन्मान दिला. हा सन्मान मिळवताना तिचे प्रतिस्पर्धी होते, दलाई लामा, पोप फ्रान्सिस आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा.
नुकतच बरोबर एका वर्षाने अॅन्जाने पुन्हा एकदा ह्या चिमुरड्यासोबतचा फोटो शेअर केला. होपला आता शाळेत जायला लागला आहे.
चेटूक करतात म्हणून लहानपणीच कुटुंबीयांनी सोडून दिलेल्या या मुलांच्या मनावर या घटनेचे सहजासहजी न मिटणारे असे तीव्र पडसाद उमटलेले असतात. ह्यातून बाहेर काढून त्यांना प्रेम देणाऱ्या होप आणि तिच्या संस्थेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
रस्त्यावर एकट्या पडलेल्या मुलांना  पाहून बहुतांश जरी नाकाला रुमाल लाऊन पुढे निघून जातात तरी काही मात्र त्यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देतात....नुसते सगळेच निरोज गेस्ट नसतात......

अॅन्जा लोवन आणि तिच्या संस्थेविषयी आणखी जाणून घेण्यासाठी: https://dinnoedhjaelp.dk/en/

No comments:

Post a Comment

Hope is a good thing—perhaps the best of things—and no good thing ever dies

Hope is a good thing—perhaps the best of things—and no good thing ever dies. Imagine growing up in a community where you're not allowed ...